नवी दिल्ली : कुख्यात माफिया डॉन छोटा राजनला आज रात्री उशिरा इंडोनेशियातून भारतात आणलं जाणार आहे. मात्र आपणाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती छोटा राजननं केलीय. छोटा राजनला मुंबई पोलिसांचीच भीती का वाटतेय? हा खास रिपोर्ट
अधिक वाचा - काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे; छोटा राजनचा दावा
मुंबई पोलिसांची तुलना थेट स्कॉटलंड यार्डशी केली जाते. तरीही छोटा राजनचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. याचं कारण म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. एकेकाळचा त्याचा बॉस आणि आता कट्टर दुश्मन. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा गेम वाजवण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत कशी घ्यायची, हे दाऊदला चांगलंच ठाऊक आहे.
अधिक वाचा : भारतात आणल्यानंतर इथं ठेवलं जाईल छोटा राजनला...
पोलिसांना प्रतिस्पर्धी गँगच्या शूटरची टीप देऊन डी कंपनीनं अनेक विरोधकांचे एन्काऊंटर घडवून आणल्याचा इतिहास आहे. अशा वादग्रस्त एन्काऊंटरमध्येच रमा नाईक, अमर नाईक, माया डोळस, मन्या सुर्वे, सुरेश मंचेकर आणि मोहम्मद कालिया अशा नामचीन गुंडांचा खात्मा करण्यात आला.
अधिक वाचा - छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ
पोलीस दलात दाऊदचे अनेक खबरी आणि हितचिंतक असल्याची भीती राजनला आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरून दया नायक, प्रदीप शर्मा, रवींद्र आंग्रे अशा वादग्रस्त पोलीस अधिका-यांना निलंबितही करण्यात आलं होतं.
एवढंच नव्हे तर दाऊद आपल्या हस्तकांकडून अगदी जेलमध्ये देखील प्राणघातक हल्ला घडवू शकतो, अशी भीती राजनला आहे. कारण राजननं स्वतः २००२ साली कुख्यात गुंड ओ. पी. सिंह याची नाशिक जेलमध्ये आपल्या गुंडांकरवी हत्या केली होती. डॉन अबू सालेमवरही दाऊद गँगच्या गुंडांनी हल्ला केला होता. अगदी कोर्टाच्या आवारात अश्विन नाईकवर गोळ्या झाडण्यात आल्या.
१९८३मध्ये बडा राजन आणि अमीरजादा यांनाही कोर्टाच्या आवारात ठार मारण्यात आलं. १९९२ मध्ये जे.जे. हॉस्पिटलमध्ये गवळी गँगचा गुंड शैलेश हळदणकरवर अंदाधुंद फायरिंग करण्यात आलं होतं. दरम्यान, छोटा राजन ताब्यात आल्यानंतर त्याला कुठं ठेवायचा, हा देखील प्रश्न आहे. क्राइम ब्रँचच्या युनिट नं. १ मध्ये त्याला ठेवण्यात येणार असल्याचं समजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.