मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिचा अपघात झालाय. महालक्ष्मी स्टेशनजवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. उर्वशीच्या मैत्रिणीची दुचाकी होती. या गाडीवर उर्वशी मागे बसली होती.
उर्वशीच्या मैत्रिणीचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. त्यात उर्वशीच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झालीये. तर मैत्रिणीला किरकोळ इजा झालीये. सुरुवातीला तातडीनं जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिचे वडील मनसे अध्यक्ष राज ठाकरे जसलोकमध्ये पोहोचले.
जसलोकनंतर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवलं
पहाटे तिला पुढील उपचारांसाठी हिंदुजामध्ये हलवण्यात आलं. संपूर्ण कुटुंब तसंच राज ठाकरे यांचे निकटवर्तीय हिंदुजा रुग्णालयात हजर होते. आज दुपारी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसंच डोक्यावरही टाके घालण्यात आले.
दरम्यान, उर्वशीच्या अपघाताची बातमी कळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच त्यांच्या पत्नी रश्मी यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाऊन उर्वशीच्या प्रकृतीची चौकशी केली.
राज-उद्धव यांची १५ मिनिटं चर्चा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीही यावेळी भेट झाली. सुमारे 15 मिनिटे हे दोघेच एकाच खोलीत होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना त्यांचा नियोजित कल्याण-डोंबिवली दौरा रद्द केल्याबद्दल विचारणा केली. तसंच राज्यात प्रादुर्भाव झालेल्या डेंग्यूच्या साथीबद्दलही दोघांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
राज-उद्धव पाऊण तास हॉस्पिटलमध्ये होते. टोकाचे राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक नात्यातला ओलावा दोघांनीही जपण्याचा प्रयत्न केला. उर्वशीची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती रश्मी ठाकरे यांनी दिली.
तसंच रुग्णालय व्यवस्थापनानेही एका पत्रकाद्वारे उर्वशीची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट केलंय. डॉ. संजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वशीवर उपचार सुरु आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.