हायकोर्टानं रेल्वेला दिल्या 'क्राऊड कंट्रोल' टिप्स!

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळी खच्चाखच भरलेली गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 'क्राऊड कंट्रोल टेक्निक'चा वापर करता येईल, असं मत नोंदवलंय.

Updated: Oct 15, 2015, 05:13 PM IST
हायकोर्टानं रेल्वेला दिल्या 'क्राऊड कंट्रोल' टिप्स! title=

मुंबई : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळी खच्चाखच भरलेली गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 'क्राऊड कंट्रोल टेक्निक'चा वापर करता येईल, असं मत नोंदवलंय.

गर्दीच्या वेळेत मुंबई आणि ठाण्यातून रेल्वेनं प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येवर सुओ मोटो' अंर्तगत एका याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्या. नरेश पाटील यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

यावेळी, मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना केल्यात. 

# गर्दीच्या वेळी 'ऑल स्टँडिंग बोगी'चा विचार करावा... या बोगींमध्ये बसण्यासाठी सीट नसतील मात्र गर्दीच्या वेळी सर्व जण उभ्यानं प्रवास करू शकतील. 

# गर्दीच्या वेळी 'डबल डेकर' ट्रेनचा विचार करावा. वेस्टर्न लाईनवर सध्या लांब पल्ल्याची डबर डेकर ट्रेन सुरू आहेत. 

# एखाद्या खाजगी संस्थेकडून सर्व्हे करून आणि जाणकारांची मतं घेता येतील.

# लेडीज स्पेशल ट्रेनमध्ये जेष्ठ नागरिकांनाही सामावून घेण्याबाबात विचार करावा. 

जेष्ठ नागरीकांसाठी रेल्वेनं खास उपाय करण्याची गरज आहे. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार दिवसाला सुमारे 38 हजार जेष्ठ नागरिक रेल्वेनं प्रवास करतात. मात्र, एका ट्रेनमध्ये केवळ 14 सीट जेष्ठ नागरिकांसाठी आरक्षित असतात. गर्दीनं खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये जिथं पाय ठेवायलाही जागा नसतानाही तिथं जेष्ठ नागरीक आरक्षित सीट पर्यंत पोहचणार कसे? असा सवालही यावेळी न्यायालयानं विचारलाय.

हायकोर्टानं या सूचनांवर रेल्वे प्रशासनाकडून उत्तर मागितलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता १८ नोव्हेंबरला होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.