'कॅच मी अॅन्ड हँग मी'... मुलानंच केली आईची हत्या?

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांताक्रूझमध्ये घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे त्या पोलीस अधिका-याच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय आहे.

Updated: May 25, 2017, 10:47 AM IST
'कॅच मी अॅन्ड हँग मी'... मुलानंच केली आईची हत्या? title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांताक्रूझमध्ये घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे त्या पोलीस अधिका-याच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिपाली गणोरे यांचा मृतदेह... आणि त्याशेजारी रक्तानं लिहिलेला 'टायर्ड ऑफ हर, कॅच मी अँड हँग मी' असा संदेश... या खळबळजनक मर्डर मिस्ट्रीमुळं मुंबई पोलिसांची झोपच उडालीय. सांताक्रूझ पश्चिमेला असलेल्या ए. के. पार्क इमारतीच्या ए विंगमधील रूम नंबर ३०३ मध्ये हा प्रकार घडलाय. 

शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी ज्ञानेश्वर गणोरे यांच्या घरातच त्यांची पत्नी दिपाली यांची निर्घृण हत्या करण्यात आलीय. गणोरे कामावरून घरी परतले तेव्हा त्यांनी घराची बेल वाजवली. पण बराच वेळ झाला तरी कुणीच दरवाजा उघडत नसल्यानं त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा पत्नी दिपाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनीच पोलिसांना फोन करून झाल्या प्रकाराची माहिती दिली.

दिपाली गणोरेंच्या मृतदेहा शेजारीच 'मी तिला कंटाळलोय... मला पकडा आणि फासावर लटकवा' असा रक्तानं लिहिलेला संदेश होता. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केल्यानंतर दिपाली यांचा मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी पाठवण्यात आलाय. या घटनेनंतर गणोरेंचा मुलगा आणि घरातील एक सदस्य बेपत्ता असल्याचं आढळलंय. गणोरे यांच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

आपल्याच मुलीची म्हणजे शीना बोराची हत्या घडवून आणणारी इंद्राणी मुखर्जी... या हाय प्रोफाइल हत्याकांडाचा तपास करणारे ज्ञानेश्वर गणोरे... आता त्यांच्या पत्नीची त्यांच्याच मुलानं हत्या करावी, याला नेमकं काय म्हणायचं?