मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातले काँग्रेस नेते आणि पक्षाची विधानसभेची तयारी ढेपाळली आहे, असं वाटत असेल तर हे चित्र बदलण्याची सुरूवात कधीच काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा चालविली असताना दुसरीकडे प्रदेश काँग्रेसनेदेखील 206 विधानसभा मतदारसंघातील तीन संभाव्य
उमेदवारांची नावे समन्वयांमार्फत मागवून लढाईची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या राज्यभर निर्धार मेळावे घेत असल्यामुळे काँग्रेसनेदेखील
आपली तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेणार आहेत.
सध्या काँग्रेस नेत्यांच्या विभागीय बैठका होत आहेत. विधानसभा निवडणुकीला नव्या उमेदीने सामोरे जाण्याचा निर्धार पक्षाने केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेसचे 82 आमदार आहेत. जिथे पक्षाचा आमदार नाही असा 26 मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची चाचपणी काँग्रेसने सुरू केली आहे.
प्रत्येक मतदारसंघासाठी एकेक समन्वयक नेमण्यात आला आहे. या समन्वयकांकडून त्या मतदारसंघांची इत्यंभूत माहिती गोळा केली जात आहे. काँग्रेसचे आमदार असलेल्या 82 मतदारसंघांमधून माहिती मागवण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबली जाणार आहे.
राष्ट्रवादीने उद्या आघाडी तोडलीच तर त्यादृष्टीने तयारी असली पाहिजे, त्यासाठी ही पूर्वतयारी असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. काँग्रेसमध्ये अधूनमधून नेतृत्व बदलाच्या बातम्या पेरण्याची लाट येत असते, ती थांबण्याची गरज असल्याचंही काँग्रेसमधील काही नेत्यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.