मुंबई : ख्रिसमस, इयर एन्ड, न्यू इयर आणि गुलाबी थंडी... एकीकडं थंडीचा आनंद लुटण्यासाठी प्लान आखले जातायत तर दुसरीकडं रस्त्यावर राहणा-यांसाठी मात्र ही थंडी जीवघेणी ठरतेय. असेच काही गारठलेले संसार सावरण्यासाठी मदतीच्या ऊबदार हातांची गरज आहे.
महाबळेश्वरपेक्षाही जास्त थंडी सध्या मुंबईत आहे. कुडकुडायला लावणारी ही थंडी आणि थंडीपासून बचाव करण्याची ही धडपड. ज्यांना घर नाही, डोक्यावरचं आभाळ हेच छप्पर आहे, त्यांची ही धडपड. पोटाची खळगी भरायला मायानगरी मुंबईत आलेल्या आणि रस्त्यावर रात्र काढणा-या गुजराती कुटुंबाचं हे जिणं. अंगावरची एखादी चादर हाडं गोठवून टाकणा-या थंडीचा काय सामना करणार.
बोच-या थंडीतल्या या जीवघेण्या काळरात्री... परप्रांतियांनाच नव्हे तर भूमीपुत्रांनाही या थंडीनं गारठून टाकलंय. आधीच बेरोजगारी आणि त्यात दुष्काळ त्यामुळे गावातलं घरदार सोडून अनेक मराठी कुटुंबांनाही, मुंबापुरीचा रस्ता धरावा लागतोय. कुठं अंगाचं मुटकूळ करुन, तर कुठं स्वतःला पुठ्ठ्याच्या खोक्यात लपवून, थंडीपासून वाचण्याची कसरत करावी लागतेय.
घरातले वापरात नसलेले गरम कपडे, जुन्या चादरी किंवा कपडे, त्यांच्यासाठी नक्कीच देऊ शकतो. आज रात्री थंडी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडाल, तेव्हा सोबत एखादं जुनं ब्लँकेट किंवा चादर घेऊन जा आणि या गरीबांना द्या. निराधारांना थंडीपासून वाचवूया, चला एक पाऊल पुढं टाकूया... असं आवाहन झी मीडिया करतंय...तुमची ही मायेची ऊब त्या गरीबांना मोठं बळ देईल, एवढं नक्की.