सावधान! स्टील उद्योग बंद होण्याची भीती

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाडा इथल्या स्टील उद्योजकांच्या दहा सदस्यांच्या एका शिष्टमंडळानं बुधवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन इथं भेट घेऊन वाडा, जिल्हा पालघरच्या स्टील उद्योगांना स्वस्तदरानं वीज देण्याची मागणी केली. 

Updated: Sep 23, 2015, 06:48 PM IST
सावधान! स्टील उद्योग बंद होण्याची भीती   title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाडा इथल्या स्टील उद्योजकांच्या दहा सदस्यांच्या एका शिष्टमंडळानं बुधवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन इथं भेट घेऊन वाडा, जिल्हा पालघरच्या स्टील उद्योगांना स्वस्तदरानं वीज देण्याची मागणी केली. 

पालघर जिल्हयातील वाडा या आदिवासी भागात स्टीलचे अनेक उद्योग आहेत. या उद्योगांमधून एक लाख लोकांना रोजगार मिळतोय. मात्र वीजदर अधिक असल्यानं हे उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त होतेय. यासंदर्भातच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्टील उद्योजकांनी राज्यपालांची भेट घेतली. 

इथल्या स्टील उद्योगातून सरकारला ३५० कोटी रूपयांचा विक्रीकर मिळत आहे. हा उद्योग बहुतांश वीजेवर चालतो. मात्र तिथं प्रती यूनिट विजेचा भाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत अधिक आहे. त्याउलट दमण, सिल्व्हासा आणि गुजरात इथं विजेचा प्रति यूनिट भाव अतिशय कमी आहे. या पार्श्वभूमीवर वाडा इथल्या उद्योगांना विजेच्या भावात सूट न मिळाल्यास सर्व उद्योग बंद पडतील, अशी भीती वाडा इंडक्शन फर्नेस असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश मेहता यांनी यावेळी व्यक्त केली.

विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना चालना देण्यासाठी तेथील उद्योगांना लागणार्‍या विजेच्या दरात कपात सुचविण्यासाठी एक समिती गठीत करण्याचं प्रस्तावित आहे. मात्र या समितीची कार्यकक्षा वाढवून उर्वरित महाराष्ट्रातील मागास भागातील उद्योगांना देखील स्वस्त दरानं वीज देण्याबाबत विचार करावा अशी विनंती सुभाष देसाई यांनी राज्यपालांकडे केली.

दरम्यान, या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.