www.24taas.com, मुंबई
‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणावला सुरूवात झालीय. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण पहायला मिळतंय. वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावलेत.
दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह पडणारा पाऊस यामुळे सध्या वातावरण बदल झालाय. गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसानं मुंबईला चांगलाच तडाखा दिलाय. दिवसभर प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या मुंबईकरांना रात्री पडणाऱ्या पावसामुळे दिलासा मिळत असला तरी यामुळे अनेक आजार बळावले. ताप,सर्दी, खोकला, अंगदुखी आणि डोळ्यांच्या साथीसह डेंग्यू हातपाय पसरू लागलेत. त्यामुळे आजारांची लक्षणं दिसताच दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. तर पुढील चार-पाच दिवस असंच वातावरण कायम राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात येतंय.
बदललेल्या या वातावरणात नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे, तेव्हा जरा जपून राहा आणि आजाराची कुणकुण लागताच डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.