अजित पवारांनी राष्ट्रवादीचा `ताप` वाढवला

माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार यांचा ताप उतरला तरी राष्ट्रवादीचा ताप वाढला आहे. अजित पवार यांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला ताप आल्याच्या दुसऱ्या दिवशी हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. अजित पवारांचा हा नाराजीचा ताप होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 11, 2012, 07:54 PM IST

www.24taas.com,मुंबई
माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार यांचा ताप उतरला तरी राष्ट्रवादीचा ताप वाढला आहे. अजित पवार यांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला ताप आल्याच्या दुसऱ्या दिवशी हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. अजित पवारांचा हा नाराजीचा ताप होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.

अजित पवार बडोद्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. यावर माध्यमात बरीच उलटसुलट चर्चा सुरू होती. अर्थात त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांना ताप असल्याचं सांगून, त्या चर्चांना विराम दिला होता. मात्र काल ताप असलेले अजित पवार आज दुस-याच दिवशी कार्यक्रमात दिसले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज वाटप कार्यक्रमाला अजित पवारांनी हजेरी लावली.
गुजरातमधील राष्ट्रवादीच्या या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे झाडून सगळे नेते हजर राहिले आहेत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या बैठकीला अनुपस्थितीत राहिले होते. राजीनाम्यानंतर अजीत पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांची ही अनुपस्थिती सगळ्यांच्याच डोळ्यात भरणारी होती.
याबद्दल शरद पवार यांना विचारलं असता, अजितदादांना ‘ताप’ असल्यानं ते या बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. ‘अजितदादांची तब्येत ठिक नसल्याने, आम्हीच त्यांना येऊ नका’ असं सांगितल्याची पृष्ठीही शरद पवारांनी यावेळी जोडली. मात्र, ताप दुसऱ्या दिवशी उतरला कसा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. हा नाराजीचा ताप पक्षासाठी डोकेदुखी ठरणार का, असे बोलले जात आहे.