चर्चेचं गुऱ्हाळ: सेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास भाजप तयार - सूत्र

शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा चर्चा सुरू झालीय. भाजप शिवसेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. काल रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

Updated: Dec 1, 2014, 09:11 AM IST
चर्चेचं गुऱ्हाळ: सेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास भाजप तयार - सूत्र title=

मुंबई: शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा चर्चा सुरू झालीय. भाजप शिवसेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. काल रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

मंत्रिमंडळातल्या सेनेच्या सहभागावर यावेळी चर्चा झाली. शुक्रवारी रात्रीच्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा थांबली होती. मात्र काल रात्री उशिरा या चर्चेचं गुऱ्हाळ पुन्हा एकदा सुरू झालंय. 
 
गृह, नगरविकास, गृहनिर्माण, महसूल, ग्रामविकास ही पाच खाती तसंच विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद ही दोन पदं सोडून बाकीचं काहीही मागा, असा प्रस्ताव भाजपानं शिवसेनेसमोर ठेवला आहे. त्यामुळंच शिवसेनेच्या सत्तेतील सहभागात अडथळा निर्माण झाला आहे. शिवसेनेनं हा प्रस्ताव मान्य केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक होऊन मंत्रिपदं आणि खाती यांचा निर्णय होऊ शकतो, असं सांगण्यात आलं.

विस्तारानंतर १० मंत्री शिवसेनेचे...

पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, तेव्हा ही पाच खाती व दोन पदे सोडून उर्वरित खात्यांची मागणी करण्यास सांगितले. भाजपाच्या सरकारमधील मंत्र्यांची संख्या विस्तारानंतर ३२ असेल व त्यापैकी २२ मंत्री भाजपाचे तर १० मंत्री शिवसेनेचे असतील, असेही प्रधान-पाटील यांनी ठाकरे यांना सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.