...आणि सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच भाजप बॅकफूटवर!

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मांस बंदीच्या मुद्यावर अखेर पडदा पडलाय. मुंबई महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर चार दिवसांची बंदी दोन दिवसांवर आलीय. या मुद्यावरून भाजपची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं अशी झालीय.  

Updated: Sep 11, 2015, 09:27 PM IST
...आणि सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच भाजप बॅकफूटवर! title=

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मांस बंदीच्या मुद्यावर अखेर पडदा पडलाय. मुंबई महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर चार दिवसांची बंदी दोन दिवसांवर आलीय. या मुद्यावरून भाजपची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं अशी झालीय.  

मांस बंदीवरून ठाकरे बंधूंची तोफ तर धडाडलीच शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही मुंबईत रान उठवण्याचा प्रयत्न केला. या सर्व पक्षांचे टार्गेट मात्र एकच होते... ते म्हणजे भाजप... जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वासाठी भाजप सत्तेत असलेल्या मिरा भाईंदरमध्ये मांस विक्रीवर आठ दिवसांची बंदी घातली आणि पाठोपाठ मुंबईतही चार दिवसांच्या मांस बंदीचं परिपत्रक निघालं. यामुळं भाजपला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधकांना आयता विषय मिळाला.


राष्ट्रवादीचं आंदोलन

गेल्या पाच दिवसांपासून भाजप विरुध्द सर्व पक्ष असं चित्र पहायला मिळालं. मांस बंदीच्या विरोधात सेना मनसेनं कोंबड्या, मासळ्या विकून आंदोलन केलं तर मुंबईत ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्टृवादीनंही सुके बोंबील, कोंबड्या घेवून बीएमसीवर धडक मारली. परिणामी भाजपविरोधात तापत चाललेलं वातावरण पाहून भाजपच्या मुंबई अध्यक्षांनीच वाद संपवण्याची विनंती शिवसेना पक्षप्रमुखांना करावी लागली. अखेर तातडीनं पालिका सभागृह बोलावण्यात आले आणि चार दिवसांची बंदी दोन दिवसांवर आली. 

दरम्यान, राज्य सरकारनं ही उर्वरीत दोन दिवसांची बंदीही मागे घेण्यासाठी मनसे पुन्हा मैदानात उतरणार आहे, असं मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. 

राज्यात सत्तेत आल्याच्या जोरावर बीएमसीतही दादागिरी सुरू केलेल्या भाजपला शिवसेनेनंही चांगलाच इंगा दाखवला. तसंच भाजप एखाद्या मुद्यावरून बँकफूटवर गेलेली पहिल्यांदाच पहायला मिळाली.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.