www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भोई समाज पंचायतीने आंतरजातीय विवाह केलेल्या आणि अनेक वर्ष समाजातून बहिष्कृत असणा-या मुलांना पुन्हा एकदा समाजात समाविष्ट करण्य़ाचा निर्णय घेतला आहे.
शिवाय इथून पुढे देखील कोणी आंतरजातीय विवाह केला तर त्याला विरोध केला जाणार नाही त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार नाही, असा निर्णय झी मिडीयाच्या साक्षीने मुंबईत झालेल्या भोई समाजाच्या बैठकीत घेतला.
कोकणात किनारपट्टीवर राहणारा भोई समाज...या समाजात आंतरजातीय विवाहास मान्यता नव्हती. तरी सुद्धा कुणी धाडसानं तसा प्रयत्न केल्यास त्यांच्या विरोधात समाज पंचायतीचा फतवा निघत असे. झी मीडियानं या अन्याया विरोधात सातत्यानं आवाज उठवला होता.
भोई समाजातल्या अन्यायकारी घटनांविरोधात एकवटलेली मंडळी. यांचा संताप आणि त्यांनी वेळोवेळी छेडलेल्या आंदोलनाचे पडसाद आता कुठं उमटू लागले आहेत. विधायक बदल होऊ लागले आहेत. जातीबाहेर विवाह केला म्हणून भोई समाज जात पंचायत कठोर निर्णय घेत असे. बहिष्कृत करण्याचा फतवा निघत असे. त्याची झळ आत्तापर्यंत शेकडो तरुण-तरुणींना बसलेली आहे. घरातून बहिष्कृत करणे, आई-वडिलांसोबत नाते तोडणे, एकटं राहणे अशा शिक्षेला सामोरं जावं लागत असे. या समाजातील प्रेमविवाह केलेली मुलं गेली कित्येक वर्षांपासून असं बहिष्कृत जीवन जगत होती.
हा अन्याय केवळ बघत न बसता या सगळ्या प्रकरणावर झी मिडीयाने प्रकाश टाकला. विशेष वृत्त आणि कार्यक्रमांतून भोई समाजातील अन्याय करणा-या घटकांना जाब विचारला. त्यावर चर्चा घडवून आणली. त्याचच फळ आता मिळत आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढं पडलंय. जात पंचायत आणि खाप पंचायत बंद करण्याचा निर्णय भोई समाजानं घेतलाय.
भोई समाजाचा हा ऐतिहासीक आणि क्रांतीकारी निर्णय आहे. समाज परीवर्तनात झी मीडियानं मोलाची साथ दिलीये. आठवण करुन देण्यासारखी आणखी एक घटना म्हणजे मुंबईत वैदू समाजानं २७ एप्रिलला एका कार्यक्रमात जात पंचायतीला मूठमाती देऊन समाज विकास समितीची स्थापना केली होती. आता भोई समाजानेही बदलत्या काळाची पाऊलं ओळखून विधायक निर्णय घेतलाय. झी मीडिया अशा परीवर्तनाला नेहमीच साथ देत आलाय. एक पाऊल पुढे टाकत यापुढेही देत राहील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.