मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तिसरा स्मृतीदिन. या स्मृतिदिनानिमित्त आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर दाखल होणार आहेत. शिवसैनिकांचं हे एकाप्रकारे शक्तिप्रदर्शनच असेल.
स्मृतीदिनाच्या निमित्तानं होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलंय. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राजकारण, समाजकारण, कला, क्रीड़ा अशा विविध क्षेत्रातील मान्यवर स्मृतीस्थळावर येणार असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, आज शिवसेनाप्रमुखांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेकडून मुंबईतील प्रस्तावित स्मारकाची घोषणा केली जाऊ शकते. मुंबईतील महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौरांचं निवासस्थान दुसरीकडे हलवलं जाणार आहे. या स्मारकासाठी बाळासाहेबांचा २३ फूट उंच पुतळा उभारण्याचं कामही सुरू आहे. त्यामुळं अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मुद्दा निकाली निघालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.