मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता.
माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना शिवसेनेनं त्यांच्या खात्यातून मंत्रिपद द्यावं, असा आग्रह वजा दबाव भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून शिवसेनेवर आणला जातोय. आधी राज्य मंत्रिमंडळातल्या शिवसेनेच्या स्थान आणि सहभागाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची उद्धव यांची मागणी आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला जादा मंत्रीपद मिळणार असल्याचं समजतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होण्याबाबत पंतप्रधान कार्यालयातून शिवसेनेशी संपर्क साधण्यात आलाय. मंत्रिपदासाठी संभाव्य नावाची माहिती पीएमओनं मागवलीय. याबाबत शिवसेनेकडून उद्यापर्यंत प्रतिसाद दिला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद येण्याची शक्यता आहे.
येत्या 9 नोव्हेंबरला मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल पीएमओनं शिवसेनेशी संपर्क केला असला, तरी राज्यातल्या शिवसेनेच्या सत्ता सहभागाबद्दल मात्र अजूनही पेच कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
दरम्यान, राज्यात भाजप सरकारमध्ये सामील व्हायचं की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक आज सेना भवनात झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. येत्या 9 नोव्हेंबर रोजी नवनिर्वाचित शिवसेना आमदारांची बैठक होतेय. मात्र त्याआधीच याबाबतचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली. तर दुसरीकडे शिवसेना भाजप यांच्यातली बोलणी दिल्लीत सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.