www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या प्रेमीयुगलांना एकांतात बसणं महागात पडणार आहे. एकातांत बसणाऱ्या प्रेमीयुगलांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस ठाण्यांना देण्यात आलेत.
मुंबईत एकातांत बसलेल्या जोडप्यांवर आता बॉम्बे पोलीस अॅक्ट १०१ नुसार कारवाई केली जाणार आहे. या जोडप्यांकडून बाराशे रुपयांचा दंडही वसूल केला जाऊ शकतो. या परिपत्रकानुसार सार्वजनिक ठिकाणी जाणाऱ्या युगुलावर कारवाई केली जाणार नाही. मात्र, निर्जन जंगल, समुद्र किनारे, चौपाटीवर एकांतात आढळणाऱ्या जोडप्यांवर मात्र कारवाई केली जाईल.
मुंबईत गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, मरीन ड्राइव्ह, दादर चौपाटी, बांद्रा बॅन्डस्टँड, जुहू चौपाटी, वर्सोवा बीच, अक्सा बीच, मड आयलँड, गोराई बीच, मनोरी बीच अशी काही ठरलेली ठिकाणं आहेत जिथं पोलिसांना यासाठी खडा पहारा ठेवावा लागणार आहे.