www.24taas.com, मुंबई
`दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचं नेहमीच वावडं आहे, त्यामुळेच नितीन गडकरी यांना बाजूला सारण्यात आलं आहे.` असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे राज ठाकरे हे पुन्हा एकदा गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे दिसून आले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्यासाठी सज्ज झालेल्या गडकरींना, अगदी शेवटच्या क्षणी ही खुर्ची सोडावी लागली. त्यामुळे गडकरी गोटात नैराश्याचं वातावरण असतानाच, त्यांच्या मनातील उद्वेग राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी भाजपचे पुन्हा अध्यक्ष न होणं हे अनपेक्षित होतं. भाजपमधीलच एक गट गडकरी बिनविरोध पुन्हा अध्यक्ष होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळेच, गडकरींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गडकरींना पाठिंबा दिला आहे.
भाजपमधील घडामोडीवर राज ठाकरेंनी झी २४ तासकडे आपली प्रतिक्रिया दिली. गडकरी प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांच्यावर जेव्हा आयकर छापे टाकले, तेव्हाच त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळण्यास अडचण येणार, हे निश्चित झालं होतं. किंबहूना हे छापे म्हणजे गडकरींना पुन्हा अध्यक्षपद मिळू नये, यासाठीच केलेली तजवीज होती, असं राज ठाकरे म्हणाले.