लखनभैया एन्काउंटर- २१ जणांना जन्मठेप

छोटा राजनचा हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया याच्या बोगस चकमकीच्या खटल्यात आज सेशन कोर्टाने पोलिस अधिकारी प्रदीप सूर्यवंशीसह २१ जणांना हत्या-कटकारस्थानाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 12, 2013, 07:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
छोटा राजनचा हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया याच्या बोगस चकमकीच्या खटल्यात आज सेशन कोर्टाने पोलिस अधिकारी प्रदीप सूर्यवंशीसह २१ जणांना हत्या-कटकारस्थानाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
२१ आरोपींना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील २१ दोषींमध्ये १३ पोलिसांचा समावेश असून, एवढ्या मोठ्या संख्येने पोलिस दोषी ठरलेला हा पहिलाच खटला आहे. १३ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
सहा पोलिस अधिकारी, सात अंमलदार
दोषी ठरलेल्या आरोपींमध्ये सहा पोलिस अधिकारी, सात अंमलदार आणि अन्य आठ जणांचा समावेश आहे. दोषी ठरलेल्यांत पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, विनायक शिंदे, तानाजी देसाई, रत्नाकर कांबळे, शैलेंद्र पांडे, अकिल खान, हितेश सोलंकी, मनोज मोहनराज, सुनील सोलंकी, नितीन सरतापे, मोहम्मद शेख, देवीदास सकपाळ, जनार्दन भणगे, दिलीप पालांडे, प्रकाश कदम, गणेश हरपुले, आनंद पाताडे, पांडुरंग कोकम, संदीप सरदार, सुरेश शेट्टी, अरविंद सरवणकर यांचा समावेश आहे.

लखनभैयाचा एन्काऊंटर प्रदीप शर्माच्या पथकाने ११ नोव्हेंबर २००६ मध्ये वर्सोव्यात "नाना-नानी पार्क`मध्ये केला होता. या पथकाचे नेतृत्व सूर्यवंशीने केले होते. लखनभैयाला लागलेली गोळी शर्माच्या पिस्तुलातली होती, असे स्पष्ट झाले होते.
लखनभैयाला पोलिसांनी त्याच्या वाशी येथील घरातून एन्काऊंटरच्या दिवशी ताब्यात घेतले होते. त्या वेळेस अन्य एक साथीदार अनिल भेडा हादेखील पोलिसांच्या ताब्यात होता. त्यामुळे भेडा या खटल्यातील प्रमुख साक्षीदार होता; परंतु त्याची साक्ष होण्याच्या आदल्या दिवशीच (मार्च २०११) त्याचेही अपहरण झाले होते. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी भेडाचा मृतदेह नवी मुंबई पोलिसांना सापडला होता.
भेडा या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. त्याच्या मृत्यूमुळे पुरेसा पुरावा शर्माच्या विरोधात उभा राहिला नाही, असे अभियोग पक्षाचे म्हणणे आहे. शर्माच्या सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. शर्माला पोलिसांनी ८ जानेवारी २०१०मध्ये अटक केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.