रिक्षा परवान्यांची लॉटरी जाहीर, महिलांसाठी राखीव परवाने पडून

रिक्षा परवाने मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी  मंगळवारी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. यावेळी, राज्यातील ४२,७९८ रिक्षा परवान्यांसाठी लॉटरी काढण्यात आली. विजेत्यांना 'एसएमएस'द्वारे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

Updated: Jan 13, 2016, 12:39 PM IST
रिक्षा परवान्यांची लॉटरी जाहीर, महिलांसाठी राखीव परवाने पडून title=

मुंबई : रिक्षा परवाने मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी  मंगळवारी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. यावेळी, राज्यातील ४२,७९८ रिक्षा परवान्यांसाठी लॉटरी काढण्यात आली. विजेत्यांना 'एसएमएस'द्वारे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, या लॉटरीमध्ये केवळ महिलांसाठी तब्बल १,७८१ परवाने राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, यासाठी केवळ ४६५ महिलांनीच अर्ज केला. त्यामुळे, अर्ज केलेल्या सर्व महिलांना परवाने मिळाले आहेत. परंतु, उर्वरित १,३१६ परवाने अजूनही शासनाकडे शिल्लक आहे. 

या लॉटरीमध्ये विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना  १ फेब्रुवारीपर्यंत संबंधित आरटीओ कार्यालयात कागदपत्रे दाखल करावे लागतील. तर १५ फेब्रुवारीपासून इरादापत्र वाटप करण्यात येईल. 

महिलांसाठी वेगळ्या रंगाच्या रिक्षा
हे उर्वरित परवाने महिलांनाच मिळतील, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय. महिला रिक्षाचालकांचं प्रमाण वाढावं, यासाठी आता रिक्षा संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. 

येत्या महिन्याभरात आणखी एक लाख रिक्षा परवाने काढण्यात येतील, अशी घोषणाही रावतेंनी यावेळी केलीय. रिक्षा चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या रिक्षांचा रंग वेगळा असेल आणि ही रिक्षा महिलांनाच चालवावी लागेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

त्यामुळे, महिलांनो तुम्हीही राज्यात १५ वर्षांपासून राहत असाल आणि तुम्हाला मराठी (अनिवार्य) येत असेल तर वाट कसली पाहताय... तुम्हीही या परवान्यांसाठी अर्ज करू शकता... आणि उत्पन्नाचं साधन मिळवू शकता.