www.24taas.com, मुंबई
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा प्रस्तावाला पर्यावरण मंत्रालयाच्या विरोधामुळे बारगळलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. आता स्मारकासाठी नवी जागा किनारपट्टीवर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
राज्य सरकारनं हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला होता. मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या दणक्याने आता राज्यसरकारपुढं प्रश्नचिन्ह उभं राहील आहे. न्यूयॉर्कमधल्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा मोठा पुतळा उभारण्याचा हा प्रस्ताव होता. त्यासाठी 100 कोटींचा खर्च अपेक्षित होता.
राज्य सरकारने या नियोजीत महत्वाकांक्षी स्मारकासाठी समुद्र किनाऱ्या लगत नवीन जागेचा शोध सुरु केला आहे. जागा निश्चित झाली की मुख्यमंत्र्यांसोबत त्याची पाहणी करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. जागेच्या निवडीबाबत काहीही सांगण्यास पवारांनी नकार दिला.
याआधी स्मारकाची जागा मलबार हिल, गिरगाव चौपाटी आणि मरिन ड्राईव्हच्या पट्टयात निश्चित करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत स्मारकाच्या आराखड्याला अंतिम रुप देण्यात आले होते. २००९ साली झालेल्या निवडणुकीच्या वेळेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिलं होतं.