www.24taas.com, मुंबई
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर आणि विनोद घोसाळकर हे वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांच्या अंगावर धावून गेले. तसंच दोन्ही बाजूंकडून अपशब्दांचा जोरदार भडीमारही झाल्यानं सभागृहाला आखाड्याचं स्वरूप आलं होतं.
लातूरमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान पाच लोकांना आलेल्या अंधत्वाबाबत प्रकरण तापल्यानं हा प्रकार घडला. त्यामुळं गोंधळात भर पडला आणि कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. सभागृह तहकुब असताना शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यानी विजयकुमार गावित यांच्याबाबत अपशद्ब वापरले.
त्यानंतर गावितांनाही त्याला प्रत्युत्तर दिले. इतर आमदारांनी मध्यस्थी केल्यामुळं पुढचा अनर्थ टळला. त्यानंतर पुन्हा १५ मिनिटांसाठी विधानसभा तहकूब करण्यात आली. अखेर मुख्यमंत्र्यानी या प्रकरणी हस्तक्षेप करत डोळे गमावलेल्यांना एक लाख, तर अंशत्व अंधत्व आलेल्याना पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे.