www.24taas.com, मुंबई
दादरमध्ये गेल्या ४0 वर्षांपासून वृत्तपत्र विक्री करणार्या सुभाष खानोलकर (५५) यांचा मुंबई महापालिकेच्या कारवाईचा धसका बसल्याने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
खानोलकर यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांसोबत मुंबईभरातून वृत्तपत्र विक्रेत्यांनी रुग्णालयात गर्दी केली. तेथे पालिका अधिकार्यांचा आणि त्यांच्या कारवाईचा निषेध नोंदविला गेला. खानोलकर यांच्या मृत्यूला पालिका अधिकारीच जबाबदार असून त्यांच्याविरोधात ३0२ कलमान्वयेच कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेता मिनाक्षी मयेकर, हरी पवार यांनी केली.
मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस हरी पवार यांनी सांगितले की, बाराच्या सुमारास जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन फौजफाटा आणि पोलीस बंदोबस्तात खानोलकर यांच्या स्टॉलवर आले. यापुढे स्टॉल लावायचा नाही. पेपर विकायचेच असतील तर रस्त्यावर पथारी पसरून पेपर विकायचे. पेपरव्यतिरिक्त मासिके, पुस्तके विकायची नाहीत, असे खानोलकर यांना दम भरण्यात आला. अन्य अधिकार्यांनी खानोलकर यांच्या स्टॉलवरील मासिके घेतली आणि रस्त्यावर उधळली. याच धंद्याच्या तुटपुंज्या मिळकतीत खानोलकर घर चालवीत होते.
पालिका अधिकार्यांच्या या धमकीमुळे उद्यापासून आपला धंदा बंद होतोय की काय, घर कसे चालणार, मुलीचे शिक्षण कसे पुरे करायचे, तिचे लग्न कसे होणार या विचाराने खानोलकर यांना अस्वस्थ झालेत. त्यामुळे त्यांचा बळी हा पालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे गेला आहे. त्यांच्यावर ३0२ अन्वये कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी हरी पवार यांनी केली आहे.