बाळा नांदगावकर गटनेतेपद सोडणार?

आ.बाळा नांदगावकरांनी गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे

Updated: Feb 21, 2012, 10:31 AM IST

www.24taas.com,मुंबई 

 

आमदार बाळा नांदगावकरांनी गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना परळ, शिवडी, लालबागमध्ये पराभव पत्कारावा लागला. मनसेच्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नांदगावकरांनी पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. बाळा नांदगावकर हे मनसेचे विधानसभेतील गटनेते आहेत.

 

राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा त्यांच्या सोबत बाळा नांदगावकर हे एकमेव आमदार गेले होते. बाळा नांदगावकरांनी आपली कारकिर्द राज ठाकरेंसाठी पणाला लावली होती.

 

तसंच छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, त्यावेळेस त्यांना पराभूत करत नांदगावकर जायंट किलर ठरले होते. बाळा नांदगावकर आतापर्यंत सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांचाही पराभव नांदगावकरांनी केला.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर मागील निवडणुकीत त्यांनी सेनेच्या दगडू सकपाळांना आस्मान दाखवत मतदारसंघावर असलेली आपली निर्विवाद पकड सप्रमाण सिद्ध केली होती. पण महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना निवडून आणण्यात नांदगावकरांना मात्र अपयश आलं. बाळा नांदगावकरांच्या मतदारसंघातून मनसेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही, याची खंत वाटल्याने आज मनसेच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याचं वृत्त आहे.

 

मनसेच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दगाबाजी केल्याचा संशय नांदगावकरांनी व्यक्त केला आहे. दगाबाजी केलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी नांदगावकर करणार असल्याचं समजतं.