आघाडीत आज झाडाझडती, कोण जाणार?

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवाची काँग्रेस हायकमांडकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबईचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना दिल्लीचं बोलावणं आलं आहे.

Updated: Feb 20, 2012, 10:15 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवाची काँग्रेस हायकमांडकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबईचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना दिल्लीचं बोलावणं आलं आहे.  त्यामुळं आता या सर्व नेत्यांची झाडाझडती होणार आहे. तसंच कारवाईची कुऱ्हाड नेमकी कुणावर कोसळणार?याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

 

तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सारं काही आलबेल नसल्याचं चित्र पुढं आलं आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूर महापालिकांमध्ये पक्षाची कामगिरी खालावली आहे. तर नागपूर, जालना, अकोला, कोल्हापूर, गडचिरोलीच्या जिल्हा परिषदांमध्ये पराभवाचा दणका बसल्यानं स्थानिक नेतृत्वावर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्ह आहे. निकालानंतर आज काँग्रेस आणि NCPच्या नेत्यांची दिल्लीत झाडाझडती होण्याची चिन्ह आहेत. मुंबईत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणं यश मिळालेलं नाही.

 

उलट मागच्यापेक्षा काँग्रेसची स्थिती बिकट झाली. या पराभवाचं चिंतन करण्यासाठी आज राज्यातील नेत्यांना दिल्ली दरबारी हजर राहण्याचा हुकूम देण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई विभागीय अध्यक्ष कृपाशंकर सिंह, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे दिल्लीत हजर राहणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अपयशाबद्दल शरद पवार देखील दिल्लीत नेत्यांची झाडाझडती घेणार आहेत.

 

आज राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, छगन भुजबळ, आर.आर.पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील हे नेतेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विशेषत: मुंबई, ठाणे, नाशिक येथे पक्षाला मिळालेल्या अपयशाबद्दल चर्चा होणार आहे. तसच जालना, अकोला, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला अपयश आल्यानं स्थानिक नेतृत्वात बदल केला जाण्याचीही शक्यता आहे.

 

 

Tags: