बाळासाहेब-महाजनांच्या काळातही युती तुटली होती, पण...

काळाच्या ओघात युतीतला समंजसपणा संपला, महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि युतीला अखेरची घरघर लागली. महापालिका निवडणुका तोंडावर असताना युती तुटली... पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती तुटण्याची ही काही पहिली वेळ नाही... याआधीही असं घडलं होतं... पण तेव्हा सगळं घडलं समंजसपणानं...

Updated: Jan 27, 2017, 07:37 PM IST
बाळासाहेब-महाजनांच्या काळातही युती तुटली होती, पण...   title=

दिनेश दुखंडे, मुंबई : काळाच्या ओघात युतीतला समंजसपणा संपला, महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि युतीला अखेरची घरघर लागली. महापालिका निवडणुका तोंडावर असताना युती तुटली... पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती तुटण्याची ही काही पहिली वेळ नाही... याआधीही असं घडलं होतं... पण तेव्हा सगळं घडलं समंजसपणानं...

मेलेल्या पोपटाची दुसऱ्यांदा हत्या...

युती तुटली... शिवसेना - भाजप दोघांचे मार्ग वेगळे झाले... विधानसभा निवडणुकीआधी मेलेल्या पोपटाची पुन्हा एकदा हत्या झाली... पण महापालिकेसाठी युती तुटण्याची ही काही पहिली वेळ नाही...

1992 सालीही महापालिका निवडणुकीआधी ही वेळ आली होती... मुळात युती झाली ती 90 च्या दशकात... विलेपार्ल्यातली पोटनिवडणूक ऐतिहासिक ठरली. शिवसेनेनं पहिल्यांदा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला, युतीची बोलणी आधी दोन-चार वर्षं सुरू असली तरी सेना-भाजप युतीचे सूर जुळले ते याच पोटनिवडणुकीपासून... 1992 साली युती स्थगित करण्यात आली होती, पण ज्या पद्धतीनं तेव्हा बाळासाहेब आणि प्रमोद महाजनांनी तो पेचप्रसंग हाताळला त्याला तोड नाही... दोघांनीही युती तुटल्याचं संयुक्त निवेदन काढलं होतं...

तेव्हाही युती तुटली होती...

ही युती तुटल्यानंतर त्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली. युती तुटली हे अत्यंत समंजसपणे जाहीर करण्यात आलं, अत्यंत प्रगल्भपणे ती परिस्थिती हाताळण्यात आली. ना कुठली उणीदुणी, ना चिखलफेक, ना स्वबळाची खुमखुमी... त्यात संयम होता, एकमेकांविषयीचा आदर होता आणि एकमेकांना न दुखावण्याचं भानही होतं...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वाजपयी, अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या सगळ्या धुरंदर राजकारण्यांनी युतीची मुहूर्तमेढ रोवली होती... त्यात एकमेकांवरच्या कुरघोडीपेक्षा एकमेकांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार होता... पण कालांतरानं राजकारणातल्या पिढ्या बदलल्या आणि वैचारिक आधारावर झालेली युती व्यवहारापुरती उरली...

...असे सोडवले जायचे वाद

त्याकाळीही वाद भरपूर झाले, पण ते वाद वाढवायचे नाही तर सोडवायचे असतात, याचं भान नेत्यांना होतं.  युतीत एखादा वाद टोकाला गेला की प्रमोद महाजन हमखास मातोश्री गाठायचे... बाळासाहेबांच्या आधी ते माँ साहेबांनाच भेटायचे... घरगुती गप्पा झाल्या की मग राजकारणाचा विषय निघायचा... आणि वादाचे गुंते अलगद सोडवले जायचे...

युतीची घरघर कायमची संपली?

पण आता दोन्ही पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचं खऱ्या अर्थानं मनोमिलनच झालं नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा प्रचंड वाढल्या. काळाच्या ओघात वाजपयी, अडवाणी राजकारणापासून दूर झाले... बाळासाहेबांचं आणि प्रमोद महाजनांचं निधन झालं... तरी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत युती तग धरून होती... पण नंतर गोपीनाथ मुंडेंचा अपघाती मृत्यू झाला आणि युतीला मनापासून सांभाळणारा शेवटचा दुवा निखळला... तेव्हापासून युतीला घरघर लागली ती कायमची... 25 वर्षं महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या युतीची ही शोकांतिका...