आम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर

‘आम्ही कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉईज नाही...’ असं म्हणत नाराज जिल्हा पदाधिकारी आणि माजी आमदार राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी राणे मंडळींना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला पत्र लिहून दुखावलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.

Updated: Jul 3, 2014, 08:13 PM IST
आम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर title=

सिंधुदुर्ग : ‘आम्ही कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉईज नाही...’ असं म्हणत नाराज जिल्हा पदाधिकारी आणि माजी आमदार राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी राणे मंडळींना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला पत्र लिहून दुखावलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.

‘आम्ही राष्ट्रीय कॉँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि नारायणराव राणे आमचे नेते आहेत. आम्हाला बोलण्याचा, कारवाई करण्याचा, जाब विचारण्याचा अधिकार केवळ या नेत्यांचाच आहे. अन्य कुणाचाही नाही’ असं तेली आणि कुडाळकर यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.  

का दुखावले गेले काँग्रेस कार्यकर्ते  

स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या पराभवाला थेट सिंधुदुर्गातल्या काही राणे समर्थकांनाच जबाबदार धरलं. आणि नितेश यांच्या या टीकेमुळे जुन्या आणि नव्या पिढीतल्या राणे समर्थंकांमधला संघर्ष चव्हाट्यावर आलाय. 

‘नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या ठेकेदारीमुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला... यापुढे काँग्रेसमध्ये दुकान मांडणाऱ्यांची डाळ शिजू देणार नाही... भाकरी परतावी नाही, तर आता बदलावीच लागेल... राणेंच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना ताकद देणार...’ उद्योगमंत्री नारायण राणे यांचे धाकटे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची ही विधानं...  

दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची कारणमीमांसा केली. नितेश राणेंनी या पराभवाला सिंधुदुर्गातल्या जुन्या राणे समर्थकांनाच जबाबदार धरलंय. त्यांचा रोख माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत आणि संजय पडते यांच्यावरच आहे. तेली, कुडाळकर, सावंत, पडते यांची नावं जनतेला पसंद असतील, तर त्यांनाच यापुढं निवडून आणू, असा खोचक टोलाही नितेश यांनी लगावलाय. एव्हढंच नव्हे तर राणेंनी राजीनामा दिल्यानंतरही आपल्या पदांवर कायम राहिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणीही नितेश यांनी अप्रत्यक्षरित्या केली. त्यांच्या या भूमिकेला जिल्ह्यातल्या नव्या पिढीतल्या समर्थकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतोय..

गेल्या नऊ वर्षांत मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा पूर्ण न झाल्यानं नारायण राणे काँग्रेसमध्ये आधीच अस्वस्थ आहे. त्यात जुन्या आणि नव्या पिढीतल्या समर्थकांमधला संघर्ष त्यांचा अस्वस्थपणा वाढवू शकतो. आता राणे या संघर्षात नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.