नाशिक : गेल्या आठ पंधरा दिवसांपासून कोरड्या पडलेल्या नाशिकच्या रामकुंडात आज टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं. तारवारा नगर परिसरातल्या विहिरीचं पाणी रामकुंडात सोडलं जातंय. गोदावरीचं पाणी नसलं तरीही रामकुंडात पाणी आल्याने ते तीर्थ स्वरूपातच असल्याची प्रतिक्रिया देत पुरोहितांनी समाधान व्यक्त केलंय.
गंगापूर धरणात पाणी नसल्याने कोरड्या पडलेल्या नदीपात्रात पाणी सोडता येत नव्हतं. तर दुसरीकडे पवित्र रामकुंडात पाणीच नसल्याने धार्मिक विधी, पूजा अर्चेसाठी आलेल्या भाविकांना नाराजीने माघारी परतावं लागत होतं. या परिस्थितीचा पाठपुरावा करणारं वृत्त झी 24 तासने गेल्या दोन दिवसांपासून लावून धरलं होतं. त्याची तत्काळ दखल घेत टँकरच्या माध्यमातून का होईना पण रामकुंडात पाणी आणण्यात आलं.