Mahakumb Viral Sadhvi Harsha Richhariya: सोशल मीडियावर प्रयागराज महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली एक तरुणी सध्या चर्चेत आहे. गळ्यात रुद्राक्ष, फुलांच्या माळा आणि कपाळावर टीळा लावलेल्या तरुणीला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जात आहे. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणीचं नाव हर्षा रिछारिया (Harsha Richhariya) आहे. दरम्याने तिने स्वत: आपण साध्वी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच आपण नेमके कोण आहेत हेदेखील उघड केलं आहे.
हर्षा रिछारिया ही निरंजनी आखाड्यातील शिष्या आहे. तिचा जन्म उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये झाला आहे. यानंतर तिन मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये स्थलांतरित झाली. तिचे आई-वडील आजही भोपाळमध्ये राहतात. हर्षाने मुंबई, दिल्लीसह वेगवेगळ्या शहरात राहून काम केलं आहे. यानंतर ती अध्यात्माकडे वळाली. मागील अनेक काळापासून ती उत्तराखंडमध्ये राहून साधना करत आहे.
निरंजनी आखाड्याच्या संपर्कात येण्याच्या प्रश्नावर, हर्षा रिछारिया म्हणते की, ती दोन वर्षांपूर्वी महामंडलेश्वर कैलाशानंद गिरीजी यांच्या संपर्कात आली. गुरुजींना भेटल्यानंतर तिच्या आयुष्यात परिवर्तन झालं. गेल्या बऱ्याच काळापासून ती कैलाशानंद गिरीजी यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे आणि अध्यात्म आणि सनातनबद्दल शिकत आहे.
कमी वयात साध्वी बनण्याच्या प्रश्नावर हर्षाने सांगितलं की, "भक्ती किंवा साधनेसाठी वयाचं बंधन नसतं. जेव्हा ईश्वर आणि गुरुंची कृपा असते तेव्हा सर्व काही सहज होतं. तुम्ही स्वत: धर्माच्या मार्गावर चालू लागता".
रीलच्या जगातून बाहेर पडत साध्वी होण्यासंबंधी विचारलं असता ती म्हणाली की, "दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. आधी रीलच्या माध्यमातून लोकांना धर्म आणि संस्कृतीबद्दल जागरुक करत होती. आताही तेच काम करत आहे, फक्त पद्धत वेगळी आहे. पण खरंतर मला साध्वी म्हणू नये. कारण मी साध्वी होण्यासाठी गरज असलेली साधना, संस्कार आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमधून गेलेली नाही. फक्त गुरुजींकडून मंत्र घेऊन साधना सुरु केली आहे".
30 वर्षीय हर्षा रिछारियाने आपण साध्वीची दीक्षा घेतली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र आपण गुरुंकडे दीक्षेसाठी अर्ज दिला आहे. त्यावर त्यांनी विचार करु असं सांगितलं आहे. सध्या मी त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहे.
पुढे तिने सांगितलं की, "माझी वेशभूषा पाहून लोकांनी मला 'साध्वी हर्षा' नाव दिलं. मी दोन दिवसांपासून पाहत आहे की, मला 'सर्वात सुंदर साध्वी' सारख्या नावांनी बोलवलं जात आहे. पण मी हेच सांगेन की, मला साध्वी म्हणणं योग्य नाही. माझ्या गुरुंनी याची आज्ञा दिलेली नाही".
दरम्यान जुन्या रीलमधील डान्स आणि छोट्या कपड्यांवरुन ट्रोल केलं जात असल्याच्या प्रश्नावर हर्षाने सांगितलं की, "मी हे सकारात्मक पद्धतीने घेत आहे. यामुळे लोकांना आयुष्यात बदल कसा होतो हे कळेल. लोकांना मी कुठून कुठे पोहोचले हे समजेल".
हर्षाने पुढे सांगितलं की, "मी गुरुंकडे संन्यास घेण्याबद्दल विचारलं होतं, पण नकार दिला. गुरुजींनी सांगितलं की, तुला अजून कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. त्यामुळे साधन कर आणि आपलं काम कर. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा संन्यासासाठी दीक्षा देऊ. आपल्याला आता पुन्हा ग्लॅमरच्या आयुष्यात जाण्याची इच्छा नाही. आपल्याला आता आजीवन धर्माचा प्रसार करायचा आहे".