औरंगाबाद : औरंगाबादमध्ये विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांवर जबर लाठीमार करण्यात आला आहे. शिक्षकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. आपल्या मागण्यांसाठी या शिक्षकांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी मोर्चा काढला होता. त्यावेळी शिक्षकांनी रस्ते अडवल्यानं पोलिसांनी लाठीमार केला. त्यावेळी काही शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या धुमश्चक्रीत 22 शिक्षक आणि 9 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी शिक्षकांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर याच ठिकाणी कर्तव्यासाठी असलेल्या एक पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशामुळं झालाय याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर याप्रकरणी अहवाल सादर करणार आहेत. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.