नाशिक : नाशिक शहरात टेस्ट ड्राईव्हसाठी मागितलेली गाडी एकाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. १३ लाख रुपयांची टाटा सफारी चोरी झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे.
या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, द्वारका परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास द्वारका येथील शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ होती. त्यावेळी एका व्यक्तीने वाहनाबाबत थोडीफार चौकशी केली आणि टेस्ट ड्राईव्ह करण्याची मागणी केली.
संबंधित चोरट्यांच्या वाहन परवान्याची किंवा इतर कोणत्याही कागदपत्रांचौकशी करण्यात आली नाही, तसेच सेल्समन देवेंद्र मनोज पवार वय २१ याला चोरासोबत पाठवण्यात आले.
सदर शोरूममध्ये सीसीटीव्ही नाहीत. या वाहनांची कोणतीही नोंदणी झालेली नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत असल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला.
मुंबई-आग्रा हायवेने मुंबईच्या दिशेकडे निघालेल्या भामट्याने साधारणतः एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर चाकू बाहेर काढून सेल्समन पवारला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, पवारला वाहनाबाहेर फेकून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.