ठाण्यात 'मोबाईल अॅप'द्वारे महिलांचा रिक्षा प्रवास सुरक्षित

आता ठाणे शहरात रिक्षाने प्रवास करतांना महिलांना मनात भीतीला जागा देण्याची गरज नाही, कारण आता स्मार्ट ओळखपत्र उपक्रम ठाण्यात सुरू करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी रिक्षातून पडून गंभीर जायबंदी झाली.  स्वप्नाली लाड प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला विशेष महत्त्व दिले जात आहे.

Updated: Sep 18, 2014, 04:02 PM IST
ठाण्यात 'मोबाईल अॅप'द्वारे महिलांचा रिक्षा प्रवास सुरक्षित title=

ठाणे : आता ठाणे शहरात रिक्षाने प्रवास करतांना महिलांना मनात भीतीला जागा देण्याची गरज नाही, कारण आता स्मार्ट ओळखपत्र उपक्रम ठाण्यात सुरू करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी रिक्षातून पडून गंभीर जायबंदी झाली.  स्वप्नाली लाड प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला विशेष महत्त्व दिले जात आहे.

दररोज लाखोंच्या संख्येने रिक्षा प्रवास करणाऱ्या ठाणेकरांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी गुरूवारी शहरात 'स्मार्ट ओळखपत्र' या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमातंर्गत ठाणे शहरातील ५० हजार रिक्षांमध्ये 'स्मार्ट ओळखपत्र' बसविण्यात येणार आहेत. 

या ओळखपत्रात 'सुरक्षा कोड' देण्यात आला आहे. प्रवाशांनी मोबाइलमध्ये 'सेफ जर्नी' नावाचे  सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे आणि त्याआधारे हा सुरक्षा कोड स्कॅन करताच काही क्षणातच त्यांना रिक्षाचालकाची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. 

अनधिकृत रिक्षा शोधणे सोपे होणार
ठाणे शहरातील अधिकृत रिक्षांमध्ये स्मार्ट ओळखपत्र बसविण्यात येणार असल्याने शहरातील अनधिकृत रिक्षा शोधणे आता सोपे होणार आहे. त्यामुळे अनधिकृत रिक्षांवर कारवाई करणे अधिक सोयीस्कर ठरेल. तसेच हेल्पलाइनमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. 

'स्मार्ट ओळखपत्र'चा राज्यातील पहिला प्रयोग
प्रत्येक रिक्षात चालकाच्या आसनामागे 'स्मार्ट ओळखपत्र' छापील स्वरूपात असेल. त्यावर मोबाइल धरताच हा सुरक्षा कोड स्कॅन होईल. या ओळखपत्राचे छायाचित्रही प्रवाशांना काढता येणार आहे. देशातील दुसरा आणि राज्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे, असा दावा ठाणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे.

या स्मार्ट ओळखपत्रावर वाहतूक पोलीस आणि महिला हेल्पलाइनचे क्रमांक देण्यात आले असून त्या क्रमांकावर संपर्क साधताच महिलांसह अन्य प्रवाशांना तात्काळ मदत मिळू शकते, असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. एका खासगी कंपनीमार्फत 'स्मार्ट ओळखपत्र' तयार करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक रिक्षाचालकाला शंभर रुपये खर्च येणार आहे.

महिलांना पोलिस हेल्पलाईनशी संपर्क साधणे सोपं होणार
या ओळखपत्रामध्ये रिक्षाचालकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, रिक्षाचा क्रमांक, वाहतूक पोलीस आणि महिला हेल्पलाइनचे क्रमांक देण्यात आले असून ते साधारण ओळखपत्रापेक्षा आकाराने मोठे असणार आहे.

या ओळखपत्रामध्ये आधारकार्डप्रमाणे 'सुरक्षा कोड' देण्यात आला आहे. त्याआधारे रिक्षाचालकाची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळणार आहे. रिक्षामध्ये प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी म्हणजेच चालकाच्या आसनाच्या पाठीमागील बाजूस हे स्मार्ट ओळखपत्र बसविण्याच्या सूचना वाहतूक शाखेने केल्या आहेत. 

या नव्या योजनेसाठी रिक्षाचालकांची माहिती एका अर्जाद्वारे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ठाणे शहराबरोबरच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी शहरात ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.