आपल्या सासरी अमित शहांनी केला पवारांवर वार

 भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह अल्पकाळासाठी कोल्हापूरात आले होते. आपल्या नातलगांची भेट घेण्यापूर्वी शहा यांनी विमानतळ परिसरातच छोटेखानी सभा घेऊन त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला...

Updated: Sep 18, 2014, 02:31 PM IST
आपल्या सासरी अमित शहांनी केला पवारांवर वार title=

कोल्हापूर :  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह अल्पकाळासाठी कोल्हापूरात आले होते. आपल्या नातलगांची भेट घेण्यापूर्वी शहा यांनी विमानतळ परिसरातच छोटेखानी सभा घेऊन त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला...

यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शहांनी तुफानी हल्लाबोल केला. महाराष्ट्रात राजकारणाचं व्यापारीकरण करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शरद पवारांनीच, असं शाह यांनी म्हटलंय.

दरम्यान, यावेळी काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल यांनी शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

शाह यांच्या पत्नी सोनल मुळच्या कोल्हापूरच्या आहेत. सभा आटोपती घेतल्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कोल्हापूरच्या जावयानं महालक्ष्मीचं दर्शनही घेतलं. 

‘शिवसेनेनंही नरमाईची भूमिका घ्यावी’ 
‘भाजपनं एक पाऊल पुढे टाकलंय, शिवसेनेनंही थोडी नरमाईची भूमिका घ्यावी, असं अमित शाह यांनी यावेळी म्हटलंय. शिवसेना भाजपमधील जागावाटपाबाबत तणाव शिगेला पोहचला असताना अखेर भाजपाने काहीसं नरमाईचं धोरण स्वीकारलंय. शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवायचीय असं भाजपनं अखेर स्पष्ट केलंय.

भाजपाच्या 288 जागांमधील वाटपाबाबतच्या अपेक्षा भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथुर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्यात. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या भाजप कोरकमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. आर की पार अशी भूमिका याआधी घेणाऱ्या भाजपनं बैठकीनंतर एक पाऊल मागे घेतल्याचं दिसून येतंय. उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेवरच जागावाटप व्हावे असा आग्रह मात्र भाजपनं धरला असून त्याबाबतचं मतही सेनेसमोर मांडल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. तसंच गेल्या निवडणूकीत ११९ जागा भाजपनं लढवल्या होत्या. तेव्हा या ११९ जागांवरील उमेदवारांची यादी कोअर कमिटीनं नितीन गडकरींशी चर्चा करुन निश्चित केलीय.. या ११९ उमेदवारांच्या यादीबाबत भाजपची केंद्रीय संसदीय समिती लवकरच निर्णय घेणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर सांगितलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.