वकील असल्याचं सांगून तो याकूब मेमनला जेलमध्ये भेटला

३० जुलैला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूब मेमनला फाशी दिली जाणार आहे. नागपूरच्या हायप्रोफाईल सेंट्रल जेलची सुरक्षा व्यवस्था किती तोकडी आहे. इथल्या सुरक्षेचे कसे तीन तेरा वाजले आहेत हा प्रकार नुकताच उघड झालाय.  

Updated: Jul 22, 2015, 06:11 PM IST
वकील असल्याचं सांगून तो याकूब मेमनला जेलमध्ये भेटला  title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, मुंबई: ३० जुलैला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूब मेमनला फाशी दिली जाणार आहे. नागपूरच्या हायप्रोफाईल सेंट्रल जेलची सुरक्षा व्यवस्था किती तोकडी आहे. इथल्या सुरक्षेचे कसे तीन तेरा वाजले आहेत हा प्रकार नुकताच उघड झालाय.  

नागपूरचं हे सेंट्रल जेल... या जेलमध्ये अनेक हायप्रोफाईल कैदी आहेत.  इथंच याकूब मेमनला फाशी दिली जाणार आहे. मात्र या जेलच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजलेत. याकूब मेमनचा वकील असल्याची बतावणी करून दिल्लीच्या शुबल फारूख या व्यक्तीनं याकूब मेमनची तब्बल १ तास भेट घेतल्याचं उघड झालंय. फारूखच्या ओळखपत्राची मुदत जानेवारी २०१३ मध्येच संपल्याचं उघड झालंय. त्यामुळं या अवैध ओळखपत्राच्या आधारे त्याला इथं प्रवेश मिळालाच कसा? असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय. 

याविषयी झी मीडियानं शुबल फारूख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आपण व्यस्त असल्याचं कारण सांगत त्यांनी बोलणं टाळलं. यासंबंधी तुरूंग अधिक्षक योगेश देसाई यांना विचारलं असता फारूखचा वकालतनामा आणि इतर सर्व कागदपत्र तपासूनच प्रवेश दिल्याचं तसंच याआधीही तो याकूबला भेटण्यासाठी तुरूंगात आल्याचं देसाई यांचं म्हणणं आहे. नागपूरच्या कारागृहाच्या सुरक्षेबाबत याआधी वारंवार प्रश्न चिन्ह उपस्थित केलं गेलंय. मात्र या प्रकारानंतर इथल्या व्यवस्थेची झोप उडाली असेल हे निश्चित...

दरम्यान, दुसरीकडे मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फाशी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. फाशी देणारा जल्लाद किंवा फाशीवानाचे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातंय. फाशीची दोरीही तपासली जातेय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.