मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे मंत्री आणि विभागीय प्रतोद यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रतोदांनी मंत्र्यांपुढे नाराज आमदारांचे प्रश्न मांडले.
शिवसेनेचे राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्याबद्दल आमदारांच्या जास्त तक्रारी असल्याचं या प्रतोदांनी सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदारांच्या या नाराजीवर सुभाष देसाईंनी स्पष्टीकरण दिलं. मे 2016 च्या आधी शिवसेना आमदारांनी सांगितलेली कामं केल्याचं सुभाष देसाई बैठकीत म्हणाले. दिवाकर रावतेंनीदेखील या बैठकीत त्यांची बाजू मांडली.
कामं होत नसतील तर सरकारमधून बाहेर पडा आणि बाहेरून पाठिंबा द्या, अशी मागणीही शिवसेना आमदारांनी या बैठकीत केल्याचं समजत आहे. एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्याबाबत मात्र आमदारांची तक्रार नव्हती. ही चर्चा ऐकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील सर्व कामं त्यांच्या विभागीय प्रतोदांकडे द्यावीत असं सांगितलं. विभागीय प्रतोद आणि उद्धव ठाकरे स्वत: या कामांचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.
शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांच्या संदर्भात शिवसेनेचे प्रतोद आणि मुख्यमंत्री यांची लवकरच एक बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना आमदारांची कामं मार्गी लावण्यासाठी काय करता येईल याबद्दलचा निर्णय होणार आहे.
मातोश्री वर पोहोचलेले मंत्री
एकनाथ शिंदे
सुभाष देसाई
दिवाकर रावते
दीपक सावंत
दादा भुसे
दीपक केसरकर
अर्जुन खोतकर
गुलाबराव पाटील
रामदास कदम
संजय राठोड
विजय शिवतारे
रविंद्र वायकर
मातोश्री वर पोहोचलेले शिवसेना प्रतोद
सुनिल प्रभू
संजय शिरसाठ
शंभुराजे देसाई
सुभाष साबणे
अनिल कदम
प्रताप सरनाईक
अजय चौधरी
राजेश क्षीरसागर