युती सरकारमधील राज्यमंत्री गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीत दाखल

राष्ट्रीय जनता दलाची संपूर्ण राज्य शाखाच राष्ट्रवादीत विलीन करून जेमतेम 24 तास झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला. 1995-99 दरम्यान युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

Updated: Dec 15, 2016, 08:53 PM IST
युती सरकारमधील राज्यमंत्री गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीत दाखल title=

नागपूर : राष्ट्रीय जनता दलाची संपूर्ण राज्य शाखाच राष्ट्रवादीत विलीन करून जेमतेम 24 तास झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला. 1995-99 दरम्यान युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव आदी उपस्थित होते. 

मला विविध पक्षातून प्रवेशासाठी ऑफर होत्या. परंतु, शेतकऱ्यांशी नाळ असलेला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे  शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे त्यांनी म्हटले.

गावंडे यांनी गेल्या रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हाच ते राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झाले होते.  अकोट या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक ते अकोला पश्चिम मतदारसंघातून लढले आणि पराभूत झालेत.  दरम्यान, आपण शिवसेनेला का सोडचिठ्ठी दिली ते अकोल्यात शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर करू असं गावंडे यांनी यावेळी सांगितलं.