मुंबई : पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. सामनामधून शिवसेनेनं मोदींच्या निर्णयावर आगपाखड केली आहे.
काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतो, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या सवाशे कोटी आहे.
हे सर्व लोक भ्रष्टाचारी व काळा पैसावाले आहेत काय? देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे. आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय? अशी बोचरी टीका सामनामध्ये करण्यात आली आहे.