रत्नागिरी : श्री गणरायाचे आगमन.. मृदंग.. ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण.. काल्पनिक पौराणिक वगनाटय़ सादर करणारी ही नमन-खेळे लोककला... कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवासीय ही परंपरा आजही जपत आणि जोपासत आहेत.
पारंपरिकतेबरोबरच आधुनिकतेकडे सध्या या नमन खेळ्यांनी वाटचाल केलेली...मग त्यामध्ये सामाजीक संदेश देणारा काही भाग असुदे तर डीजीटल स्क्रीनच्या माध्यमातून विविध देखावे नमनामध्ये सादर केले जातायत कोकणातील बहुधा हा पहिलाच प्रयोग आहे.
मृदुंगावर थाप पडते आणि कोकणातल्या पारंपरिक नमन आणि खेळ्यांना सुरूवात होते ती शिमगोत्सवात... शिमगोत्सवात सुरू झालेला हा पारंपरिक प्रकार मग पालखीची रूपं उतरत नाही तोवर गावागावत सुरू राहतो...खास करून गुहागर तालुक्यातील खेळे आणि नमन वैशिष्टेय पूर्ण... गुहागर तालुक्यातील भातगाव धक्का इथंही नमन सादर करण्यात आलं मात्र याला जोड होती ती आधुनिकतेची. भातगाव धक्का गावाची ग्रामदेवता असलेली जुगाई देवीची पालखी प्रथम नाचवली गेली आणि मग मृदुंगावर थाप पडली आणि खेळे आपली कला सादर करण्यासाठी स्टेजवर उभे राहीले.
खेळे, नमनामध्ये ३०-४० लोक सहभागी असतात.... एका विशिष्ट झगेदार पोशाखात हे कलाकार दोन रांगेत आडवे उभे राहतात. प्रत्येकाच्या हातात टाळ, डोक्यावर रंगीबेरंगी पगडी, अंगाखांद्यावर रंगीत ओढण्या आणि या सगळ्यांचा पुढे असतात ते दोन थेर मध्ये कोळीण आणि संकासूर...यातूनही नावीन काहीतरी देण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला जातोय.
नमनामधील बहुतांशपात्र ही तरूणवर्ग सादर करत असतात अगदी महिलांचं पात्र देखील तरूणच सादर करतात. सोबतच इथला तरुणवर्ग डिजिटल झालेलाही दिसून आला.
तब्बल दोन ते तीन महिने यासाठी तालीम घेतली जाते...भातगावात एकूण सात वाड्या आहेत. प्रत्येक वाडीला एक वर्ष नमन सादर करण्याची संधी मिळते आणि या संधीचं सोन करण्याचा प्रयत्न इथला तरूणवर्ग करताना दिसतो.
परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा उगम होऊन त्या काळानुसार विकसित झाल्या. त्यामध्ये नमन-खेळे, शक्ती-तुरा, जाकडीनृत्य, भारूड, डफावरील पोवाडे इत्यादी कलांचा समावेश आहे... कोकणातील विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील रुजलेल्या नमन-खेळे या लोककलेची प्रसिद्धी आता जगभर होतेय त्यात आणखी भर पडणार आहे ती डिजीटलायझेशनची.