पुणे : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त यांची गुरुवारी सुटका होणार आहे. तो थेट चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल होणार आहे.
संजय दत्त तुरूंगातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांचा टाळण्यासाठी विमानाने मुंबईत दाखल होणार आहे. तसेच पुणे - मुंबई एक्स्प्रेसवर सध्या दुरूस्तीचेही काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास संजय दत्त तुरुंगातून बाहेर येणार आहे. अन्य आरोपींप्रमाणेच संजयलाही तुरुंगातून बाहेर सोडण्यात येईल. तुरुंगातून बाहेर पडताना जेल कर्मचाऱ्यांना तो संजय दत्तच असल्याची ओळख पटवावी लागेल. त्याला नेण्यासाठी पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलेही येणार आहेत.
संजय दत्त मुंबईतील सिद्धिविनायक दर्शन घेणार असून आई नर्गिस यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. या पार्श्वभूमीवर वांद्र्यातील संजय दत्तच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
१९९३ मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची १६ मे २०१३ ला येरवडा कारागृहात रवानगी झाली. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला मे २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे झाली.