नंदूरबार : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदूरबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालाय.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज नंदूरबारमध्ये सातपुडा हिंदू मेळावा होणार आहे... या मेळाव्याची तयारी पूर्ण झालीय. मेळाव्यासाठी ७० जण बसू शकतील इतकं मोठं ८ फूट उंचीचं व्यासपीठ उभारण्यात आलंय. या मेळाव्याला एक लाख स्वयंसेवक उपस्थित राहतील असा दावा आयोजकांनी केलाय.
स्वयंसेवकाच्या भोजनाचीही व्यवस्था इथं करण्यात आलीय. या हिंदू मेळाव्याला आदिवासी संघटनाचा विरोध असल्यानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सरसंघचालक मोहन भागवत स्वतः हजर राहणार असल्यानं हा मेळावा भव्य आणि दिव्य करण्यात येणार आहे.
नंदूरबारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आरएसएसनं शहरातून मोठी शोभायात्रा काढली. तसंच या मेळाव्यात आयोध्येतल्या राम मंदिराची प्रतिकृत आणण्यात आलीय. त्यामुळं आगामी काळात संघाच्या अजेंड्यावर राम मंदिराचा मुद्दा प्रमुख असणार का? अशी चर्चा यानिमित्तानं सुरू झालीय.