कोल्हापूर : महानगरपालिकेत भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली केल्यात. प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात भाजपचीच सत्ता येणार असे छातीठोक सांगत होते. मात्र, काँग्रेसने त्यांच्या उत्साहावर पाणी ओतले. दरम्यान, निकाल लागल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'मै हू डॉन' आणि 'नाद करायचा नाय, पाव्हणं, नाद करायचा नाय' अशा गाण्यांवर डॉल्बीचा ठेका धरत, अनोखे उत्तर दिले.
पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने जोरदार ताकद लावली होती. यांना उकडून फेकून द्या, अशी भाषा शिवसेनेनी केली होती. तर ताराराणीशी सूत जुळवत सत्तेची स्वप्ने पाहिली होती. मात्र, त्यांची घोर निराशा काँग्रेसने केली. सतेज पाटील यांचे खणखणीत नाणे चालले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. हाच उत्साह रस्त्यावर गाण्यातून दिसून आलाय.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजयाची पहिली सलामी दिली आणि तिरंगी झेंड्यांनी सारा परिसर व्यापून गेला. गुलालाच्या पावसातच जणू कार्यकर्ते भिजू लागले. एकेका प्रभागातील निकाल जाहीर होऊ लागला आणि हा जल्लोष टिपेला पोचला. मोटारसायकलचे सायलेन्सर निघाले. 'मै हू डॉन' आणि 'नाद करायचा नाय, पाव्हणं, नाद करायचा नाय' या गाण्यांवर ठेका सुरू झाला. मतमोजणी केंद्रापासूनच विजयाच्या मिरवणुका सुरू झाल्या आणि माहोल काँग्रेसमय झाला.
भाजप, ताराराणी, राष्ट्रवादी, अपक्ष या सर्वांना बाजूला सारत काँग्रेसच्या विजयी उमेदवारांनी 'एकच वादा - सतेज दादा' च्या घोषणा देत परिसर दुमदूमू सोडला आणि गुलालाची उधळण झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.