रायगड : राजमाता जिजाबाईंच्या पाचाड येथील राजवाडा परिसराची दूरवस्था झालीय. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या वास्तुकडे पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या जिजाऊंच्या समाधी स्थळापासून अवघ्या पाच मिनीटांच्या अंतरावर त्यांच्या राजवाड्याचा परिसर आहे. याच वाड्यात जिजाऊ रहात होत्या. अखेरचा श्वासही त्यांनी याच वाड्यात घेतला. आता वाडा शिल्लक राहिला नसला तरी त्याच्या पाऊलखुणा आजही आहेत. मात्र या परिसराला आज अवकळा आली आहे. येथे केवळ गवताचे साम्राज्य पसरले आहे.
किल्ले रायगड आणि जिजाऊंची समाधी पहायला येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांची पावले इकडे वळतात खरी पण येथील परिस्थिती पाहून हताश होतात. १४ एकरचा हा परिसर पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलाय तो फलक लावण्यापुरता. परंतु त्याची डागडुजीही केली जात नाही. पायाचे दगडही निखळू लागलेत. पुरातत्व विभागाने हा परिसर अडगळीत टाकल्याची भावना शिवभक्त व्यक्त करत आहेत.
स्थानिक ग्रामस्थ या परिसराची देखभाल करायला तयार आहेत. परंतु त्यात पुरातत्व विभागाचा अडसर आहे. जिजाऊंच्या जयंतीनिमित्त पाचाडला आलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे ग्रामस्थांनी या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले.
छत्रपतींच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करणार आहे. पण या ऐतिहासिक वास्तू हीच खरी स्मारके आहेत. त्याकडे सरकारचे यापुढेही असेच दुर्लक्ष झाले तर इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.