पुणे : महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा आज पुण्यात फडकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या तिरंग्याचं ध्वजारोहण झालं.
पुण्याच्या कात्रज परिसरात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. हा ध्वजस्तंभ ७२ मीटर्स म्हणजेच २३७ फुट उंचीचा आहे. कात्रजचे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून हा कायमस्वरूपी ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
कात्रजमध्ये उभारण्यात आलेला हा ध्वजस्तंभ उंचीच्या बाबतीत देशात पाचव्या क्रमांकाचा असणार आहे. त्याचं वजन १४ टन आहे. त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आलाय.
कात्रज परिसरात पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून उद्यान तलाव, फुलराणी, कारंजे अशा अनेक गोष्टी साकारण्यात आल्या आहेत. देशाचं भूषण असलेल्या तिरंग्याची त्यात भर पडलीय.
आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.