पोलिसांकडूनच अपहरण आणि एक कोटीचा दरोडा

व्यापाऱ्याचे अपहरण करून, एक कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन त्याला लुटण्यात आले.

Updated: Dec 24, 2015, 12:57 PM IST
पोलिसांकडूनच अपहरण आणि एक कोटीचा दरोडा title=

नवी मुंबई : मुंबईहून मंगळुरूला खासगी ट्रॅव्हल्स बसने जाणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून, एक कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन त्याला लुटण्यात आले. लुटणाऱ्या टोळीतील पाच दरोडेखोरांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे यात ट्रॉम्बे पोलिस ठाण्यातील दोन पोलिस सबइन्स्पेक्टर आणि एका पोलिस नाईकाचा समावेश आहे. लुटलेल्या एक कोटींपैकी ५० लाख, ५० हजार रुपये हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सबइन्स्पेक्टर पंकज खैरनार, सबइन्स्पेक्टर नीलेशकुमार संदानशिव, पोलिस नाईक जनार्दन राजे यांच्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी चार आरोपींचा शोध चालू आहे. परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त शहाजी उमप यांनी ही माहिती दिली. 

फरार आरोपी अल्ताफ हा कर्नाटकमध्ये राहणारे व्यापारी मोहम्मद काजिया यांच्या शेजारी राहतो. काजिया हे मुंबईत मोठी रक्कम नेण्यासाठी येणार असल्याचे कळल्यानंतर त्याने त्याची माहिती भटकळ येथील हनीफ याला दिली. हनीफने मग पोलिसांशी संधान बांधून काजिया यांना लुटण्याचा कट रचला. 

काजिया खासगी बसने जात असताना आपण क्राइम ब्रँचचे पोलिस आहोत, असे सांगत वाशी येथे हे पोलिस बसमध्ये घुसले. त्यांनी काजिया यांना पैशांच्या बॅगसह खाली उतरवले. त्यानंतर स्कॉर्पिओमधून त्यांना उरणच्या दिशेने नेऊन रात्री उशिरापर्यंत फिरवण्यात आले. 

अखेर जंगलात त्यांना सोडून एक कोटी रुपये घेऊन या दरोडेखोरांनी पोबारा केला. काजिया यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर मोठ्या कौशल्याने पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दरोडेखोरांना अटक केली.