पुणे: राज्यासह पुणे जिल्ह्यावर दुष्काळाचं गडद सावट असताना पुणे जिल्हा बॅँकेचे संचालक मात्र भूतानच्या दौऱ्यावर गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या हौशी संचालकांनी बँकेच्या पैशांवर परदेशवारीची हौस भागवलीय. यावर कुणी आक्षेप घ्यायला नको म्हणून अभ्यास दौराचं नावं देऊन या टूरचं आयोजन करण्य़ात आलंय.
भूतानमध्ये ना कोणती नावाजलेली बँक, ना बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेली वित्त संस्था. मग हे संचालक नेमका कशाचा अभ्यास करायला भूतान गेले आहेत हे कोडंच आहे. पावसाळा लांबल्यामुळं बळीराजाचा जीव मेटाकुटीला आलाय. राज्यासमोर दुष्काळाचं संकट भेडसावत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मात्र जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून भूतानची हवा खात आहेत.
पीडीसीसी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एकहाती वर्चस्व आहे. तसंच गेल्या २५ वर्षांपासून बँकेचे संचालकही आहेत. मात्र या चालाख संचालकांनी अजित पवारांना कल्पना न देताच हा भूतान दौऱ्याची योजना मंजूर करून घेतली. आता अजित पवार या हौशी संचालकांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या संचालकांनी आपल्या अभ्यास दौऱ्याबाबत सारवासारव केलीय. बँकेच्या पैशांवर भूतानवारीची हौस भागवल्याचं वृत्त झी मीडियानं प्रसारीत होताच संचालक मंडळानं या दौऱ्याचा खर्च स्वत: उचलणार असल्याची तयारी दर्शवलीय.
कोणत्याही अभ्यास दौऱ्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाला सहकार खात्याची परवानगी घ्यावी लागते. मात्र या संचालक मंडळानं यासंदर्भातली परवानगी घेतलेली नव्हती. तसंच जिल्हा बँकेवर वर्चस्व असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही याबाबत कल्पना दिलेली नव्हती. यासंदर्भात स्वत: भूतानच्या दौऱ्यावर असलेले बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याची कबुली दिली.
पुणे जिल्हा बॅँकेच्या 24 संचालकांपैकी भूतानला फिरायला गेलेले प्रमुख संचालक कोण आहेत पाहूयात
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.