राज्यातील 26 ठिकाणांचं 'लवासा'करण शक्य- शरद पवार

सह्याद्रींच्या रांगांना आता जाणत्या राजाचा आधार मिळालाय. महाराष्ट्राच्या या नैसर्गिक वारश्याचं 'लवासाकरण' करण्याची शरद पवारांची इच्छा आहे. महाराष्ट्रात 26 ठिकाणी लवासा सारख्या लेक सिटी उभारण्याची या महान नेत्यांची कळकळ विरोधकांना का बरे कळत नाही?

Updated: Jun 24, 2014, 04:54 PM IST
राज्यातील 26 ठिकाणांचं 'लवासा'करण शक्य- शरद पवार title=

 

पुणे: सह्याद्रींच्या रांगांना आता जाणत्या राजाचा आधार मिळालाय. महाराष्ट्राच्या या नैसर्गिक वारश्याचं 'लवासाकरण' करण्याची शरद पवारांची इच्छा आहे. महाराष्ट्रात 26 ठिकाणी लवासा सारख्या लेक सिटी उभारण्याची या महान नेत्यांची कळकळ विरोधकांना का बरे कळत नाही?

निसर्गसौंदर्यांनं नटलेल्या ह्या सह्याद्रीच्या डोंगरद-या म्हणजे महाराष्ट्राचं वैभव.. निसर्गानं महाराष्ट्रावर मुक्त हस्तानं उधळण केलीय.. या निसर्गसौंदर्याचं करावं तरी काय, हे आजवर राज्यातील कुणाही नेत्याला कळलं नाही हेच खरं... 

पण थांबा... महाराष्ट्राच्या नव्या जाणत्या राज्याला या राज्याची काळजी आहे... महाराष्ट्राचं निसर्गवैभव पर्यटनाच्या माध्यमातून फुलवण्याची कळकळ या जाणत्या राजाला आहे... 

याच कळकळीतून पुणे जिल्हात लवासासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहिलाय हे विरोधकांना का बरं कळत नाही ?

विरोधक आणि पर्यावरणवादी अशा दूरदृष्टीच्या प्रकल्पांना विरोध का बरं करतात ? आता विरोध करणं थांबवा आणि आपली दृष्टी विशाल करा... शरद पवारांसारखा जाणता राजा फक्त एक लवासा उभारुन थांबणार नाहीय... 

अहो, असे तब्बल 26 आणखी नवे प्रकल्प राज्यात उभे राहू शकतात, असा दुरदृष्टीचा विचार शरद पवारांनी मांडलाय...

शरद पवारांना अपेक्षित आहे ते राज्याचं 'लवासाकरण'.. 

विरोधकांना काय, विरोध करण्याची सवयच झालीय. पण प्रसारमाध्यमांनी तरी तारतम्य बाळगावं ना? चांगल्या कामांना विरोध करण्याची आणि माध्यमांनी त्याला प्रसिद्धी देण्याची सवय सोडावी हेच बरं... खुद्द शरद पवारांनीच तसं आवाहन केलंय...

शरद पवारांना आदर्श वाटणारा लवासा प्रकल्प कायमच वादग्रस्त ठरलाय.. विरोधक एकापाठोपाठ एक कळीचे मुद्दे उपस्थित करताहेत... निसर्ग, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. स्थानिक भूधारकांच्या मुळावर हा प्रकल्प येतोय... याला विकास म्हणावं का ? बघा बघा विरोधक कसे मानसिकता बदलायला तयार नाहीत ते...

लवासा प्रकल्प उभा राहिला तो शरद पवारांच्या संकल्पनेतून.. अशा कितीतरी संकल्पना त्यांनी पुण्यामध्ये मराठा चेंबरच्या ८० व्या वर्धापण दिनानिमित्त उपस्थितांसमोर मांडल्या..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.