डॉक्टरांनीच आपले अवयव दान करत मांडला नवा आदर्श

आज जागतिक अवयव प्रत्यारोपण दिन साजरा होतोय, त्या पार्श्वभूमीवर हा डॉक्टरांचा एक आदर्शच इतरांच्या समोर आलाय. 

Updated: Aug 13, 2014, 11:42 AM IST
डॉक्टरांनीच आपले अवयव दान करत मांडला नवा आदर्श title=

नागपूर : रक्ताची नातीही जिथं कमी पडतात, तिथं कधीकधी कुणी परका कामाला येतो. नागपूरच्या नेहा पांडेंसाठी एक साठी उलटलेले डॉक्टर असेच धावून आले. नागपूरच्या एका डॉक्टरानंच पुढे येत आपली किडनी दान करून मानवतेचा नवा अध्याय रचला... आज जागतिक अवयव प्रत्यारोपण दिन साजरा होतोय, त्या पार्श्वभूमीवर हा डॉक्टरांचा एक आदर्शच इतरांच्या समोर आलाय. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, गरजूंना माफक दरात उपचार असे अनेक उपक्रम डॉ. किशोर मोहरील यांनी आयुष्यभर राबवले. पण, वयाची साठी पार केल्यानंतरही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही त्यांची इच्छा कायम होती. त्यातूनच त्यांनी आपली किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेणे सोपे नव्हते, कारण ते स्वतः मधुमेहानं पीडित होते.

आपल्या मित्राच्या माध्यमातून त्यांना गायन शिक्षिका नेहा पांडे यांच्या आजाराबद्दल समजलं. रक्तदाब आणि इन्फेक्शनमुळे ४४ वर्षांच्या नेहा पांडे यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. नेहा आणि बांधकाम व्यावसायिक असलेले त्यांचे पती अनिकेत दोघेही किडनी दात्याच्या शोधात होते. अशातच त्यांची भेट डॉ. किशोर मोहरील यांच्याशी झाली.

किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक त्या सर्व मेडिकल चाचण्या झाल्यावर डॉ. मोहरील यांची किडनी नेहा पांडे यांना दान करण्यात आली. आपल्या दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे नाउमेद झालेल्या नेहा पांडेंना त्यामुळं पुनर्जीवन लाभलं. त्यांच्यासाठी डॉ. किशोर मोहरील आता देवाचं दुसरं रूप बनलेत.

डॉ. मोहरील यांच्या या धाडसी निर्णयात पेशानं डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. लता मोहरील यांनीही मोलाची साथ दिली. अवयव प्रत्यारोपणाअभावी अनेक रूग्णांचे मृत्यू होत असताना, वृद्ध डॉक्टर दाम्पत्याचा हा निर्णय स्तुत्य म्हणावा लागेल. जिवंतच नव्हे, तर अगदी एखादी मृत व्यक्तीही अवयव दान करून किमान पाच लोकांच्या जीवनात नवे रंग भरू शकते, याची जाणीव यानिमित्तानं सर्वांनी ठेवायला हवी.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.