पुणे : कुख्यात गुंड बाबा बोडके यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावरून झालेला गदारोळ शमत नाही तोच निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपात सुरु असलेलं इनकमिंग वादात सापडलंय. दरम्यान, न्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महापालिकेची उमेदवारी देणार नसल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.
भाजपमध्ये सध्या पक्षप्रवेशाची धूम सुरु आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच राज्यसभेचे खासदार संजय काकडे याकामी पुढाकार घेताहेत. मात्र, त्यामध्ये गुन्हेगारी पार्शवभूमी असलेल्यांनाहीही पवित्र करून घेण्याचा सपाटा स्थानिक नेत्यांनी लावलाय. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा नगरसेवक पिटू धाडवे यांच्यासह पप्पू घोलप आणि शाम शिंदे यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. या तिघांवरही पुण्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश समारंभ पार पडला. मात्र आता हा फोटोदेखील व्हायरल झाल्यानं पक्षाची अडचण झालीय. अशावेळी पक्ष प्रवेशाच्या बाबतीत बॅकफूटवर जाण्याची वेळ पक्षावर आलीय.
बाबा बोडकेसोबतच्या फोटोबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला मोठी कसरत करावी लागली होती. आता या नवीन फोटोवरूनही खळबळ उडालीय. त्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महापालिकेची उमेदवारी देणार नसल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलय. आणि त्याचवेळी पक्ष वाढवण्यासाठी अचानकपणे सक्रिय झालेल्या खासदार संजय काकडेंनाही शह दिलाय.