मुंबई: कोकणात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय. भास्कर जाधव यांच्याविरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार निलेश राणे यांनी केलाय. जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार निलेश राणे यांनी केलीय.
लोकसभा पराभवानंतर काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी थेट अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांनाच आव्हान देण्याचं निलेश राणेंनी जाहीर केलं आहे.
भास्कर जाधव हे गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवतात. त्यांच्याविरोधात थेट गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचं निलेश राणे यांनी आज जाहीर केलं.
लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं धोका दिल्यामुळं पराभवाचा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यामुळं आपल्या पराभवाचं बदला घेण्यासाठी निलेश राणे यांनी थेट भास्कर जाधवांसमोरच आव्हान उभं करण्याचं जाहीर केलं आहे.
भास्कर जाधवांची पैशांची मस्ती उतरवणार असं सांगत निलेश यांनी त्यांच्या विरोधात लढण्याची घोषणा केली. त्यांच्या या इच्छेला काँग्रेसचं पाठबळ मिळण्याची शक्यता कमीच असल्यानं अपक्ष लढवण्याची घोषणाही निलेश यांनी केली आहे.
दरम्यान, नीलेश राणे यांनी पक्षाला विश्वासात घेऊन अशा प्रकारची घोषणा केलेली नसल्याचे पक्षाचे प्रवक्त सचिन सावंत यांनी सांगितले. स्थानिक मुद्द्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद असतील पण ते पक्षश्रेष्ठी सोडवतील असेही सावंत यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.