नाशिक पोटनिवडणुकीत मनसेचं इंजीन धक्क्याला

महापालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवून शिवसेना आणि मनसेसह सर्वच पक्षांना पिछाडीवर टाकलंय. हा विजय भाजपचा नाही तर गुंडगिरी, पैसा आणि सत्तेच्या गैरवापराचा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलंयं. तर दोन हक्काच्या जागा गमावल्यावर मनसे नेते प्रतिक्रिया द्यायलाही टाळाटाळ करत आहेत. 

Updated: Aug 29, 2016, 10:01 PM IST
नाशिक पोटनिवडणुकीत मनसेचं इंजीन धक्क्याला title=

नाशिक : महापालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवून शिवसेना आणि मनसेसह सर्वच पक्षांना पिछाडीवर टाकलंय. हा विजय भाजपचा नाही तर गुंडगिरी, पैसा आणि सत्तेच्या गैरवापराचा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलंयं. तर दोन हक्काच्या जागा गमावल्यावर मनसे नेते प्रतिक्रिया द्यायलाही टाळाटाळ करत आहेत. 

कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आणि गुलालाची उधळण भाजपचे नगरसेवक करत आहेत. प्रभाग क्रमांक 35 ब मधून मंदाताई ढिकले आणि 36 ब मधून सुनंदा मोरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. मात्र भाजपच्या या विजयाला मात्र वेगळीच किनार आहे. 

निवडणुकीआधी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नगरसेवर पवन पवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या हाती कमळ देऊन पक्षानं त्यांना पावन केलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत गुन्हेगारी, गुंडगिरी, दहशत, पैशाचा महापूर आणि सत्तेच्या गैरवापरातून विजय मिळवल्याची टीका विरोधक करत आहेत. 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतर मतदारांना घराबाहेर पडून दिलं नाही, गुंडांना हाताशी धरून भाजपने निवडणूक जिंकल्याचा आरोप करण्यात येतोय. 

कुख्यात पवन पवारच्या भाजप प्रवेशामागचं गुपीत खरतर उघड होतं. त्यामुळे विजयी जल्लोषातही पवन पवारच्याच कार्यकर्त्यांचा बोलबाला पहायला मिळाला. आगामी महापालिका निवडणुकीतही भाजप हंड्रेड प्लसचं उद्दीष्ट सहज गाठेल असा आत्मविश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत. 

ज्या जागांवर भाजपचा झेंडा फडकला, त्या दोन्ही जागा मनसेच्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक फटका मनसेला बसलाय, महापालिकेतली मनसेची सदस्यसंख्या आणखी दोनने कमी झालीय. 

शिवसेनेनं पराभव स्वीकारून त्याचं विश्लेषण तरी केलंय. पण मनसे तर प्रतिक्रियाही द्यायला तयार नाही. मात्र मतदारांनी या निवडणुकांचा काय अर्थ घ्यायचा आणि पुढच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात होतील का असे गंभीर प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.