पुणे : जिल्ह्यातील १० पैकी ३ नगरपरिषदांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला तडा दिला आहेत तर काँग्रेसने देखील आपली ताकत वाढवून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. शिवसेना आणि स्थानिक आघाड्यांच्या पदरी फारसा नफा तोटा पडला नाही.
पुणे जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती. दुस-या बाजुला पहिल्या टप्प्यातील यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी भाजपनं आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातल्या दहा नगरपालिकांचे निकाल अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत.
जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती बारामती नगरपरिषदेची. बारामतीमध्ये भाजप आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच घाम फोडला. जरी राष्ट्रवादीने गड राखला तरी बारामतीतल्या पवारांच्या वर्चस्वाला तडा देत विरोधी आघाडीचे कधी नव्हे ते ४ उमेदवार निवडून आले आहेत.
इंदापूर नगरपरिषदेत हर्षवर्धन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना जेरीस आणलं होतं. याठिकाणी काँग्रेसला काठावरचं का होईना यश मिळाल्यानं पाटलांची पाटीलकी वाचली आहे.
इंदापूरप्रमाणेच सासवडमध्ये काँग्रेसला सत्ता राखण्यात यश आले आहे. याठिकाणी कॉग्रेस प्रणित आघाडीने शिवसेना –राष्ट्रावादी कॉग्रेस आघाडीचा पराभव केला. याठिकाणी शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर जेजुरीमध्येदेखील कॉग्रेसने सत्तांतर घडवून आणले. याठिकाणी असलेली राष्ट्रावादी कॉग्रेसची ३ दशकांची सत्ता काँग्रेसने काबीज केली.
जुन्नर आणि दौंडमध्ये नगरसेवकांचे बहुमत एका पक्षाला आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाला अशी स्थिती झाली आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व राखले असले तरी नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला आहे. तर दौंडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला जास्त जागा मिळाल्या मात्र नगराध्यक्षपद नागरिक हितसंरक्षण मंडळाकडे गेले. दौंडमध्ये देखील सासवडप्रमाणे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढले.
तळेगाव आणि लोणावळ्यात भाजपने राष्ट्रावदीचे वर्चस्व संपुष्टात आणले. तळेगावात भाजप आघाडीला तर लोणावळ्यात भाजपला घवघवीत य़श मिळाले. शिरुरमध्ये मात्र स्वबळावर लढणा-या भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. याठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसप्रणित शहर विकास आघाडीने सत्ता राखली. त्यामुळे भाजपचे स्थानिक आमदार असलेल्या बाबुराव पातारणे यांच्या प्रतिष्ठेला तडा गेलाय.
आळंदीमध्ये यापूर्वी शिवसेनेची सत्ता होते. भाजपचे नामोनिशाण नव्हते. यावेळी मात्र भाजपने आळंदी नगरपरिषदेवर झेंडा फडकावला. त्याबदल्यात शिवसेनेच्या बदल्यात जुन्नरचे नगराध्यक्षपद पडलं हीच एक संमाधानाची बाब.
असं सगळं असताना भाजपला जुन्नर , जेजुरी सासवड इंदापूर आणि दौंड याठिकाणी भाजपला खातेदेखील उघडता आले नाही ही बाब दुलर्क्षित करुन चालणार नाही.
या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बारामतीत तळ ठोकून होते तर धनंजय मुंडे आदी नेत्यांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रचाराचा झंझावात उडवला होता. त्याचप्रमाणे भाजपनेदेखील मुख्यमंत्र्यांच्य़ा सभा घेण्याबरोबरच नेत्यांची मोठी फळी मैदानात उतरवली होती.
या पक्षांनी जिल्ह्यातील नगरपरिषदेची निवडणूक इतकी मनावर घेण्याचं कारण स्पष्ट आहे. लवकरच महानगरपालिका आणि जि.प. पंचाय़त समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सगळ्यांच्या दृष्टीकोनातून त्या निवडणुका महत्वाच्या आहेत. स्वाभाविकपणे नगरपरिषद निवडणुकांच्या निकालाचा परिणाम आगामी निवडणुकांवर संभवणार आहे.