लातूरवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहणार?

जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुका येत्या 14 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलीय.

Updated: Oct 25, 2016, 07:42 PM IST
लातूरवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहणार? title=

शशिकांत पाटील, लातूर : जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुका येत्या 14 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलीय.

नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात लातूर जिल्ह्यातल्या चार नगरपालिकांचा समावेश आहे. ज्यात निलंगा, औसा, अहमदपूर आणि उदगीर नगर पालिकांचा समावेश आहे. यापैंकी निलंगा आणि उदगीर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात तर अहमदपूर आणि औसा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.

गेल्या निवडणुकीतल्या पक्षीय बलाबलाप्रमाणं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरस दिसत असली तरी लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर बरंच पाणी डोक्यावरुन गेलंय. त्यामुळे केंद्रात-राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेला आता चारही पालिकांवर ताबा मिळवण्याचे वेध लागलेत. 

तर लोकसभा-विधानसभेतली नरेंद्र मोदींची लाट आता ओसरली असून त्या सत्तेचा फायदा जनतेला झालेला नाही. तसंच युतीतल्या मतभेदामुळे पुन्हा एकदा जनता आपल्याच बाजूनं कौल देईल असा विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादीकडून व्यक्त केला जातोय. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणावी तशी ताकद जिल्ह्यात नसल्यामुळे ते फारसा प्रभाव दाखविण्याची सध्या तरी कसलीच चिन्हं नाहीत. मात्र तिकीट वाटपानंतर पक्षांतर्गत बंडखोरी वाढून अपक्षांच्या संख्येत काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे. 

एकूणच लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडायचा असल्यामुळे सर्वच पक्षांनी इच्छुकांची सुरू केलेली चाचपणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा नगरपालिकांवर कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.